Sunday 1 January 2017

वतनदारांचा बीमोड करणारा शेतकऱ्यांचा राजा शिवाजी

'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी' या शरद जोशी, अनिल गोटे आणि राजीव बसर्गेकर यांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे वर्णन बळीराजा नंतरचा दुसरा शेतकऱ्यांचा राजा असे केले आहे. त्यात विस्ताराने त्यांनी त्याकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांची लूट वतनदार कसे करीत आणि हे वतनदार संपवल्याखेरीज शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था संपणार नाही अशी महाराजांची भूमिका असल्याची मांडणी केली.



राज्य कुणाचेही असो, या वतनदार मंडळींनी आपापल्या इलाख्यात प्रचंड दहशत आणि लूट करून लुटीचा एक हिस्सा राजाकडे दिला की त्यांची पिढीजात वतनदारी शतकानूशतके चालू राहत असे. म्हणूनच राजाबद्दल इथे शेतकऱ्यांना कधी आपलेपणा वाटला नाही.शिवाजी महाराजांनी मात्र ही परिस्थिती बदलून टाकली. वतनदारी संपवली. म्हणूनच शेतकरी जीवावर उदार होऊन महाराजांसाठी आणि या राज्यासाठी लढले. पण ही अवस्था फार काळ टिकली नाही. या वतनदार मंडळींनी महाराजांच्या मृत्युनंतर लवकरच पुन्हा बस्तान बसवले.  शेतकऱ्यांची लूट पुन्हा सुरु झाली.


यशवंत थोरातांनी सकाळच्या १ जानेवारी च्या लेखात मोठ्या खुबीने हीच मांडणी केली आहे. शेती, शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था यात स्वारस्य असणाऱ्या सगळ्यांनी थोरातांचा '..तो बनाके छोडेंगे आशियाँ!'  हा लेख जरूर वाचावा.

प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदरकर म्हणतात,
'...त्यांना (शिवाजी महाराजांना) आयुष्यभर ज्या वतनदारांविरुद्ध लढावे लागले, ती नुसती त्यांच्या धर्माची माणसे नव्हती, तर त्यांच्या सोयरसंबंधातील माणसे होती. घोरपडे, जाधव, िनबाळकर, सावंत, सुर्वे असे वतनदार नेहमीच त्यांच्या विरुद्ध राहिले. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले? या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे.’

'रयतांना, कष्टकऱ्या शेतकऱ्यांना आणि ग्राम इलाख्यातील सामान्यांना जाच आणि भय होते, ते वतनदार, जहागीरदार, दरकदारांचे. अशा वतनदारांचा बीमोड करणारा राजा जसा भेटला, तसा त्यांच्या पोटातली भूक ओळखणारा, कष्टाला, श्रमाला स्वाभिमानाची जोड देणारा तारणहारही भेटला. संत तुकारामासारख्या कुणबीपणाचा अभिमान बाळगणाऱ्या संताने तत्कालीन दुष्काळाचे, शेतकऱ्यांच्या दैन्य स्थितीचे, त्याच्या अपार कष्टाचे, त्याच्या एकूणच शेतीविषयक अर्थशास्त्राचे वा वास्तविक निरूपण आपल्या अभंगांतून केलेले आहे. आणि या साऱ्या वस्तुस्थितीवर मात करणारा राजा भेटला, याचे समाधान संत तुकारामांनी व्यक्त केलेले आहे. शिवरायांनीही वेळोवेळी तुकोबारायावर निष्ठा व्यक्त केलेली आहे.महात्मा जोतिरावांनी म्हणून दोघांचेही कौतुक केलेले आहे. कुणब्यातील साधू तुकाराम, तर कुळवाडय़ांना भूषण असणारा राजा शिवाजी, मऱ्हाठीपणाची ही दोन प्रतीके महात्मा जोतिरावांनी ऊर्जास्थानी स्वीकारलेली होती.'

(भास्कर चंदनशिव. http://www.loksatta.com/daily/20090219/mav05.htm)

महाराजांच्या मृत्युनंतर लवकरच हे वतनदार पुन्हा प्रस्थापित झाले आणि शिवशाहीचे वैशिष्ठ्य संपले. शिवाजीच्या नावाने आजही गुंड, पुंड वतनदार, सुभेदार राजकारण करीत आहेत. हे वतनदार, सुभेदार लुटारू संपवूनच ग्रामीण भागात लोकशाही येणार आहे, या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई अजून बाकी आहे.


स्वातंत्र्यानंतर वतनदारी संपली असली तरी शतकानुशतके सत्ता गाजवणारी मंडळी नव्या रुपात ग्रामीण व्यवस्थेच्या मानगुटीवर बसली आहे. पक्ष कोणताही असो, दिल्लीत, मुंबईत राजा कोणताही असो, गावोवाव, वेगवेगळ्या इलाख्यात हे सुभेदार तशीच पकड ठेवून आहेत. ते, त्यांचे वंशज, सोयरे, भाऊबंद यांचीच सत्ता चालू आहे.

शरद जोशींचे पुस्तक इथून मिळवता येईल.

No comments:

Post a Comment