बाकी सगळे ठीक ठाक आहे.
शेतकरी, ग्रामीण पार्श्वभूमी घेऊन बाजारात खपणारे सगळे विकण्याचा ध्यास घेतलेली मंडळी सभोवारआहेत.
शेतकरी नाव जोडून अनेक कॉम्बिनेशन घेऊन संघटनांचे पीक आलेआहे.
कर्जमुक्ती गुटख्या सोबत चघळत गेली पाचपन्नास वर्षे राज्य केलेली मंडळी 'झालीच पाहिजे' म्हणताहेत.
वर्तमानपत्रात फोटो, बातम्या, चर्चा, लेख, तज्ञांची भाषणे सगळे कसे बहरलेआहे.
कांदा महागला की सरकार पाडणारे कळवळा येऊन जल युक्त शिवार करू म्हणताहेत.
डोक्यावर पाणी आणणारी बाई हा डौलदार चालीचा, चित्राचा विषय मानणारे वाटर हार्वेस्टिंग कसे आवश्यक आहे हे पटवून देताहेत.
शेतकरी जमीनदार, अडाणी, जातीयवादी, अत्याचारी, दारुडा, असे निळू फुले ब्रांड रूप चितारणारे आता त्याला दया करुणा पात्र समजताहेत.
'पाच वर्षे शेतीउत्पादानांचे भाव वाढू दिले नाहीत' अशी फुशारकी मारणारे वाघ आता गावोगाव सरकारच्या नावाने शिमगा करत आहेत.
जमिनीचे सिलिंग, पुनर्वाटप, आवश्यक वस्तूच्या कायद्या आडून व्यापारी, शेतकरी यांना बरबाद करणारे, लुटणारे लालभाई आता दोन रुपये किलो ज्वारी तांदूळ वाटून पुन्हा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणताहेत.
शेतमालाचा बाजार मोकळा करण्याचा सरकारचा प्रयत्न व्यापारी, मापारी, हमाल यांच्या संघटना, नेते यांच्या धमक्यांनी पुन्हा लांबणीवर पडायची पाळी आली आहे.
साखरेच्या निर्यातीवर प्रचंड कर लावून देशात किमती खाली रहाव्यात यासाठी उस उत्पादक शेतकरी, कारखाने यांची कोंडी केली जात आहे.
गुर ढोर पोसता येत नाहीत म्हणून विकावी तर कसाई सुद्धा हात लावायला तयार नाही.
गेल्या चार वर्षातील तीन वर्षे दुष्काळ, हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र थिरकतोय झिंगाटच्या तालावर. कला जगतात सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली यांच्या आर्ट आणि धंदा कसा शिगेला पोहोचलाय याची सर्वत्र नोंद घेणे चालू आहे.
बाकी सगळे ठीक ठाक आहे.